Headlines

अल्पवयीन विवाहितेच्या गर्भधारणेने उघडकीस आला बालविवाह; पतीसह तिघांवर पोस्कोसह गुन्हा

मलकापूर : उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफीसाठी आलेल्या १७ वर्षे ३ महिन्यांच्या अल्पवयीन विवाहितेची गर्भधारणा झाल्याचे निदर्शनास येताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. या घटनेतून अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, मलकापूर शहर पोलिसांनी पतीसह सासू-सासऱ्याविरुद्ध पोस्को कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा तसेच संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पीडित १७ वर्षे ३ महिने वयाची युवती (रा. नाशिक, सध्या मलकापूर) हिने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचा विवाह १० मे २०२५ रोजी ती अल्पवयीन असतानाच नातेवाइकांच्या संमतीने पारंपरिक पद्धतीने आरोपी शेख आफताफ शेख अब्दुला (वय २५) याच्याशी लावून देण्यात आला होता. विवाहानंतर ती पतीसोबत नाशिक येथे राहत होती. या काळात दोघांमध्ये शारीरिक संबंध झाल्याने ती गर्भवती झाली. काही दिवसांपूर्वी पीडिता आई-वडिलांकडे मलकापूर येथे आली होती. गर्भधारणेची तपासणी करण्यासाठी ती आईसोबत उपजिल्हा रुग्णालयात गेली असता, तिचे वय अल्प असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ मलकापूर शहर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पीडितेचा जबाब नोंदविला.
या प्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात अप. क्र. ४७५/२०२६ नुसार आरोपी पती शेख आफताफ शेख अब्दुला, सासरे शेख हुसेन शेख धासू (वय ४५) आणि सासू आप्रोजाबी शेख हुसेन (वय ४०) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(२), पोस्को कायद्याचे कलम ४ व ६ तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे कलम ९ व १० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश बेले करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!