खामगाव : तालुक्यातील शेलोडी येथे २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २८ जुलै रोजी घडली. सासरकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार मृत महिलेच्या वडिलांनी दिल्यानंतर खामगाव ग्रामीण पोलिसांनी पती, सासू, सासरे आणि दीर अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृत महिलेचे नाव वैष्णवी अनंता वडोदे (वय २५, रा. शेलोडी) असे आहे. याप्रकरणी तिचे वडील दीपक वामनराव बोहरूपी (वय ४८, रा. कंचनपूर) यांनी खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, पती अनंता विठ्ठल वडोदे, सासू सविता वडोदे, सासरे विठ्ठल वडोदे आणि दीर प्रशांत विठ्ठल वडोदे (सर्व रा. शेलोडी) यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.