मलकापूर : शहरातील गणेश नगर परिसरात राहणारी ३७ वर्षीय महिला स्वामी समर्थ यांच्या बैठकीसाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली; मात्र ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. कोणताही ठावठिकाणा न लागल्याने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अशोक तुकाराम काळे (वय ७१, रा. गणेश नगर, मलकापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी रुपाली अशोक काळे (वय ३७) ही २८ जुलै रोजी सकाळी सुमारे ७.४५ वाजता आनंद सोसायटी परिसरात होणाऱ्या स्वामी समर्थ बैठकीसाठी जात असल्याचे सांगून घरातून निघाली होती. मात्र सायंकाळपर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिचितांकडे शोध घेतला. सर्वत्र शोध घेऊनही तिचा मागमूस न लागल्याने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यावरून मिसिंग क्रमांक ५३/२०२६ नोंदविण्यात आला आहे. बेपत्ता महिलेचा रंग गोरा, उंची सुमारे ५ फूट ४ इंच, केस काळे आहेत. ती घरातून निघताना लाल रंगाचा पंजाबी ड्रेस, काळ्या रंगाची सलवार, गळ्यात काळ्या रंगाचा रुमाल आणि पायात साधे बूट परिधान केले होते. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ अमोल शेले करीत असून संबंधित महिलेबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास तातडीने मलकापूर शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.