खामगाव :- दारू पिण्याच्या कारणावरून झालेला किरकोळ वाद क्षणार्धात हिंसक वळणावर जात एका तरुणावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना खामगाव तालुक्यातील वाडी येथे घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खामगाव शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता भास्कर जवंजाळ (वय ३७, रा. जुनी वाडी, खामगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगेश भानुदास खोंड (वय ३०, रा. वाडी, ता. खामगाव) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०९, ३५२ व ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ जून रोजी रात्री सुमारे ९ वाजता वाडी येथील जुन्या पाण्याच्या टाकीजवळ घडली. फिर्यादीचा चुलत भाऊ नागेश मधुकर जवंजाळ हा घरातून बाहेर गेल्यानंतर बराच वेळ परत न आल्याने त्याचा शोध घेण्यात आला. यावेळी तो आरोपीच्या घराजवळ असल्याची माहिती मिळाल्याने फिर्यादी तेथे पोहोचले. त्यावेळी आरोपी मंगेश खोंड याच्या हातात लाकडी दांड्याची कुऱ्हाड होती. दारू पिण्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादातून त्याने नागेश जवंजाळ यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला. या हल्ल्यात नागेश गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हल्ल्यानंतर आरोपीने उपस्थितांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. जखमी नागेश याला तातडीने रिक्षाच्या सहाय्याने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गोंडाने करीत आहेत.