Headlines

35 हजारांच्या बदल्यात ₹3.50 लाख देण्याचे आमिष; बनावट नोटांच्या बंडलासह दोघे जेरबंद; मलकापूर शहरातील घटना

मलकापूर:- कमी पैशांत जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून लुटमार करण्याच्या तयारीत असलेल्या दोन संशयितांना मलकापूर शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने सापळा रचून अटक केली. या कारवाईत बनावट नोटांचे बंडल, दुचाकी व मोबाईल फोनसह एकूण 95 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, हैदराबाद येथील दोन इसमांना 35 हजार रुपयांच्या बदल्यात 3 लाख 50 हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून मलकापूर येथे बोलावण्यात आले होते. या व्यवहाराच्या आड लुटमार करण्याचा डाव असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी गोपाळकृष्ण नगर परिसरात सापळा रचला. यावेळी ईश्वर अशोक मेसरे (वय 34, रा. नरवेल, ता. मलकापूर, ह.मु. यशोधाम कॉलनी, मलकापूर) व गौतम मुकुंदा तायडे (वय 22, रा. रमाईनगर, मलकापूर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची झडती घेतली असता 500 रुपयांची एक खरी नोट व तिच्या खाली ‘चिल्ड्रन बँक’ असे लिहिलेल्या 500 रुपयांच्या 699 बनावट नोटा, एक पांढऱ्या रंगाची ज्युपिटर दुचाकी तसेच विविध कंपन्यांचे चार मोबाईल फोन असा एकूण 95,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी अप. नं. 454/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4), 62, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि सतीश बेले करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या आदेशाने करण्यात आली. कारवाईत पोउपनि शुभम बरदाडे यांच्यासह डीबी पथकातील कर्मचारी यांचा सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!