खामगाव:- सिव्हिल लाईन परिसरातील केला नगर येथे एका ३२ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल बाळकृष्ण कराळे (वय ३२) असे मृत युवकाचे नाव आहे. रविवारी रात्री त्याने घरातील लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेच्या वेळी त्याचे आई-वडील देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे तो घरात एकटाच असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी सकाळी शेजाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तत्काळ खामगाव शहर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, हर्षल कराळे यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असा आप्तपरिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे केला नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.