मोताळा : तालुक्यातील लोणघाट शिवारात विनापरवाना मुरुमाचे उत्खनन करून त्याची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आल्याने महसूल प्रशासनाने कारवाई केली. कारवाईदरम्यान पंचनामा सुरू असतानाच संबंधितांनी वाहनांसह घटनास्थळावरून पळ काढल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी अज्ञात जेसीबी चालकासह ट्रॅक्टरवरील दोन इसमांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. धामणगाव देशमुख येथील तलाठी मंगला नामदेव कुकडे यांना २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.४० वाजताच्या सुमारास लोणघाट शिवारात अवैध मुरुम उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तलाठी कुकडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, जेसीबी क्रमांक एमएच-२८ बीके-६०२८ आणि विना क्रमांकाच्या स्वराज ट्रॅक्टरच्या सहाय्याने मुरुमाचे उत्खनन सुरू असल्याचे आढळून आले. तलाठी यांनी उत्खननाबाबत परवाना आहे का, याची विचारणा केली असता संबंधितांकडे कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. त्यानंतर तलाठी यांनी ट्रॅक्टरचा चेसीस क्रमांक नोंदवून पंचनामा करण्यास सुरुवात केली. मात्र, कारवाई सुरू असल्याचे लक्षात येताच संबंधितांनी कारवाई टाळण्यासाठी ट्रॅक्टर व जेसीबीसह घटनास्थळावरून पळ काढला. ट्रॅक्टरमध्ये अंदाजे एक ब्रास मुरुम असून त्याची किंमत १५ हजार ६०० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी तलाठी मंगला कुकडे यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी अज्ञात जेसीबी चालक तसेच ट्रॅक्टरवरील दोन इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२), २२१ तसेच गौण खनिज अधिनियमातील कलम २१(१), २१(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बोराखेडी पोलीस करीत आहेत.