मोताळा : बसस्टँडच्या पाठीमागील पडीत जमिनीत चरत असलेल्या मेंढ्या-बकऱ्यांच्या कळपातून अज्ञात दोन इसमांनी २५ हजार रुपये किमतीचा बोकड जबरीने उचलून दुचाकीवरून पसार झाल्याची घटना मोताळ्यात घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वारुळी येथील मेंढपाळ विजय दगडू बिचकुले (वय ३३) यांच्या मेंढ्या व बकऱ्या मोताळा बसस्टँडच्या पाठीमागील पडीत जमिनीत चरत होत्या. दरम्यान, सकाळी ११ वाजेच्या सुमारास एमएच-३०-एक्स-५०२८ क्रमांकाच्या दुचाकीवरून दोन अज्ञात इसम तेथे आले. त्यांनी कळपातील तीन वर्ष वयाचा, लाल रंगाचा सुमारे २५ हजार रुपये किमतीचा बोकड जबरीने उचलून दुचाकीवर टाकला आणि तेथून पसार झाले. बोकड चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर विजय बिचकुले यांनी याबाबत बोराखेडी पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघा अज्ञात इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.