Headlines

शासकीय कारवाईत अडथळा; वाळूसह टिप्पर घेऊन पसार, चौघांविरुद्ध गुन्हा

जळगाव जामोद : अवैध वाळू वाहतुकीवर शासकीय कारवाई सुरू असतानाच तलाठ्याच्या कारवाईत अडथळा निर्माण करून विना क्रमांकाचा टिप्पर व त्यातील वाळू घेऊन पसार झाल्याचा प्रकार सातळी फाटा येथे घडला. या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी दोन नामनिर्देशितांसह दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
१३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तलाठी विनायक राजाराम रहाटे हे शासकीय कामकाज करीत असताना सातळी फाटा येथे विना क्रमांकाचा टिप्पर आढळून आला. या टिप्परमध्ये अंदाजे दोन ब्रास वाळू असून तिची किंमत सुमारे १४ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. शासकीय कारवाई पूर्ण होण्यापूर्वीच संबंधितांनी तलाठ्याची परवानगी न घेता टिप्पर व त्यातील वाळू घेऊन घटनास्थळावरून पसार झाल्याचा आरोप आहे. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी तलाठी विनायक रहाटे यांच्या तक्रारीवरून १७ ऑगस्ट रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. वैभव तेजराव हागे (रा. येरळी, ता. नांदुरा), स्वप्नील विठ्ठल मानकर (रा. हिंगणा बाळापूर जुने, ता. जळगाव जामोद) यांच्यासह अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!