आसलगाव : सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर असताना शेतात गेलेल्या १३ वर्षीय मुलीवर भरदिवसा अस्वलाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा बीट क्रमांक दोन येथे घडली. अचानक झालेल्या या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिला बेशुद्ध अवस्थेत शेत परिसरातून बाहेर काढून पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भिंगारा येथील गायत्री भाईलाल डावर (वय १३) ही दुपारच्या सुमारास शेत परिसरात गेली होती. त्यावेळी दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक तिच्यावर हल्ला केला. अस्वलाच्या हल्ल्यात गायत्रीच्या अंगावर गंभीर जखमा झाल्या. घटनेनंतर ती शेत परिसरात बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे आढळून आले. मुलीचा शोध घेत असताना ही घटना लक्षात आल्यानंतर गावातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रुक्मिणी फाउंडेशनचे अध्यक्ष संजय खंडेराव, माजी सरपंच सरदार यांच्यासह ग्रामस्थांनी गंभीर जखमी गायत्रीला उपचारासाठी अकोला येथे हलविले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, भिंगारा परिसरात वन्यप्राण्यांचा वाढता वावर पाहता शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतशिवारात कामासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, वन विभागाने या परिसरात गस्त वाढवून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.