जळगाव जामोद : डोळ्यांसमोर पाण्याचा लोंढा वाढत गेला आणि काही कळायच्या आत गोठ्यातील जनावरे पुराच्या पाण्यात अडकली. जीव वाचविण्यासाठी धावपळ सुरू असतानाच तीन म्हशी पाण्यात बुडाल्या. या दुर्दैवी घटनेत शेतकरी अशोक रामेश्वर बाराहाते यांचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असून, पुराच्या पाण्याने त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा आधारच हिरावून घेतला आहे.
जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड खुर्द येथे ३० जुलैच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला पूर आला. पुराचे पाणी अचानक शेतकऱ्यांच्या गोठ्यांमध्ये शिरले. पाण्याचा वेग आणि वाढती पातळी पाहता जनावरे सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी पुरेसा वेळही मिळाला नाही. अशोक बाराहाते यांच्या गोठ्यात पाणी शिरल्याने तीन म्हशी पुराच्या पाण्यात बुडून मृत्युमुखी पडल्या. या घटनेमुळे बाराहाते कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. पशुधन हेच शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन असताना अचानक झालेल्या या नुकसानीमुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. दरम्यान, पुरामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाने संबंधित शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. नैसर्गिक आपत्तीने हिरावून घेतलेल्या या पशुधनामुळे शेतकऱ्याला पुन्हा उभे राहण्यासाठी शासनाच्या मदतीची प्रतीक्षा आहे.