शेगाव : शेगाव-नागझरी रोडवरील शेतातून अज्ञात चोरट्याने सुमारे ३० हजार रुपये किमतीची केबल वायर चोरून नेल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी रात्री घडली. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत असून, शेगाव शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोकडिया नगर येथील विशाल अरुण कान्हेरकर (वय २७) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. रुक्माबाई नारायण कराडे यांच्या शेगाव-नागझरी रोडवरील शेतातील अंदाजे ३० फूट लांबीची केबल वायर अज्ञात चोरट्याने लंपास केली. १५ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजताच्या सुमारास ही चोरी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
चोरट्याने चोरून नेलेल्या केबल वायरची किंमत अंदाजे ३० हजार रुपये असल्याचे फिर्यादीने सांगितले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शेगाव शहर पोलिसांनी घटनाप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.