मलकापूर : शहर व परिसरात अवैधरित्या दारू विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन ठिकाणी अवैध दारूचा साठा आढळून आला. लोणवडी फाटा आणि वाघुड येथील कारवाईत एकूण १ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोघांविरुद्ध मलकापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोकॉ रहीमखान हमीदखान पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रकाश उखर्डा गोमासे (रा. सालीपुरा, मलकापूर) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.२० वाजताच्या सुमारास लोणवडी फाट्यावरील सार्वजनिक ठिकाणी तो अवैधरित्या दारू विक्री करीत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून सुमारे १ हजार रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली. दुसऱ्या कारवाईत संभाजी शंकर गायकवाड (रा. मंगलगेट, मलकापूर) याच्या वाघुड येथील राजवाडा हॉटेलवर १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.२० वाजताच्या सुमारास धाड टाकण्यात आली. यावेळी ८०० रुपये किमतीचा अवैध दारूसाठा आढळून आल्याने तो जप्त करण्यात आला. या दोन्ही प्रकरणांत मलकापूर शहर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ मधील कलम ६५(ई) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोउपनि सतीष बेले करीत आहेत.