मेहकर : कारमध्ये धारदार तलवार घेऊन संशयास्पदरीत्या थांबलेल्या एका इसमावर मेहकर पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या झडतीत कारच्या मागील सीटवर तलवार आढळून आली. या कारवाईत तलवार व कार असा एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. २८ जुलै रोजी मेहकर पोलिसांना जानेफळ चौक परिसरात एका कारमध्ये इसम तलवार घेऊन थांबलेला असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने लालाजी वाईन शॉपसमोर सापळा रचून एमएच ३७ जी ५१७० क्रमांकाच्या कारची पंचांसमक्ष झडती घेतली. यावेळी कारच्या मागील सीटवर धारदार तलवार आढळून आली. पोलिसांनी कारमध्ये असलेल्या विशाल अशोक गायकवाड (वय ३६, रा. दिवाणी कोर्टामागे, मेहकर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील सुमारे ५ हजार रुपये किमतीची तलवार तसेच ३ लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली. या प्रकरणी मेहकर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५०७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ४/२५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिस निरीक्षक व्यंकटेश्वर एस. आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर पोलिस पथकाने ही कारवाई केली.