जळगाव जामोद : पोलिसांच्या तपासातील बारकाव्यांमुळे तीन वर्षांपूर्वी पिंपळगाव काळे येथील बिरोबा मंदिरातून चोरीला गेलेल्या चांदीच्या मुकुटाचा अखेर शोध लागला आहे. दुसऱ्या मंदिर चोरीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या संशयिताची चौकशी केली असता त्याने बिरोबा मंदिरातील चोरीची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे १८० ग्रॅम वजनाचा आणि १ लाख ३६ हजार रुपये किमतीचा चांदीचा मुकुट जप्त केला.
पिंपळगाव काळे येथील बिरोबा मंदिरातून सन २०२३ मध्ये चांदीचा मुकुट चोरीला गेला होता. या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७७/२०२३, कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आरोपीचा ठावठिकाणा लागत नसल्याने प्रकरणाचा तपास सुरूच होता. दरम्यान, एका अन्य मंदिर चोरीच्या प्रकरणात संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने पिंपळगाव काळे येथील बिरोबा मंदिरातून चांदीचा मुकुट चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेला १८० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट हस्तगत केला.
या आरोपीकडून आणखी काही मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस येतात का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या चोरीचा छडा लावून मुद्देमाल हस्तगत केल्याने जळगाव जामोद पोलिसांच्या तपासाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप (खामगाव) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सोहन माचरे (मलकापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्या नेतृत्वात तपासी अधिकारी अमोल पंडित यांनी केली.