मेहकर : उपचारासाठी रुग्णालयाच्या दारात पोहोचलेल्या गर्भवती महिलेला मदतीचा हात मिळण्याऐवजी रस्त्यावरच प्रसूतीची वेळ येणे, आणि रुग्णालय अवघ्या ५० मीटर अंतरावर असतानाही आरोग्य कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी बाहेर न येणे, हा प्रकार मेहकरच्या ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा ठरला आहे. मंगळवारी सकाळी घडलेल्या या संतापजनक प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंगळवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर एक महिला प्रसूतीच्या वेदनांनी विव्हळत होती. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर रस्त्यावरच तिची प्रसूती झाली. वेदनेने महिला अक्षरशः ओरडत असतानाही तातडीची वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. या संपूर्ण घटनेचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती आहे. दरम्यान, परिसरातील सामाजिक कार्यकर्ते योगेश सौभागे यांनी परिस्थिती पाहून तातडीने ग्रामीण रुग्णालय गाठले. त्यांनी तेथील परिचारिका श्रीमती जाधव यांच्याकडे धाव घेत महिलेच्या मदतीसाठी बाहेर येण्याची विनंती केली. मात्र, रुग्णालयाबाहेर येण्यास असमर्थता दर्शविल्याचा आरोप सौभागे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी वेळ न दवडता डॉ. आव्हाळे यांच्या खासगी रुग्णालयाशी संपर्क साधला. तेथील महिला डॉक्टरांना घटनास्थळी आणून प्रसूत झालेल्या महिलेला प्राथमिक उपचाराची व्यवस्था करण्यात आली. ग्रामीण रुग्णालयात त्यावेळी डॉक्टर उपलब्ध नसल्याने अखेर संबंधित महिलेला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. सरकारी आरोग्य यंत्रणेच्या अगदी उंबरठ्यावर एका महिलेची प्रसूती होऊनही तिला वेळेवर वैद्यकीय मदत मिळू नये, ही बाब नागरिकांसाठी धक्कादायक ठरली आहे. मेहकर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची अनुपस्थिती, रुग्णांकडे होणारे दुर्लक्ष आणि प्रशासनाच्या कारभाराबाबत यापूर्वीही नाराजी व्यक्त होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मात्र, या घटनेमुळे आरोग्य व्यवस्थेतील कथित अनागोंदी पुन्हा ऐरणीवर आली आहे. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जात असून, या प्रकाराची वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी जोर धरत आहे.