मेहकर : शहरातील जिजाऊ चौक परिसरात एका ३२ वर्षीय युवकाने दारूच्या नशेत स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेत युवक गंभीररीत्या भाजला असला तरी वेळीच उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले. अमोल रमेश डाखोरे (३२) असे जखमी युवकाचे नाव आहे. तो मुळचा मांडवा फॉरेस्ट येथील रहिवासी असून उदरनिर्वाहासाठी मेहकर शहरातील गणराज भोजनालयात काम करतो. अमोल हा पत्नी आशाबाई व चिमुकल्या मुलासह रामनगरातील देशमुख यांच्या वाड्यात खोली भाड्याने घेऊन राहत होता. शुक्रवारी सकाळी अमोलने दारूच्या नशेत स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेतले आणि पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी अमोलला तातडीने शासकीय रुग्णवाहिकेतून मेहकर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. अमित धांडे यांनी त्याच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी बुलडाणा येथे रेफर केले. अमोलला दारूचे व्यसन असल्याने त्याचे कौटुंबिक जीवन विस्कळीत झाले होते. याच नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र, आत्मदहनाच्या या प्रयत्नामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.