मोताळा :- तालुक्यातील शेलापूर येथे चोरट्यांनी मोटार रिवाइंडींगचे दुकान फोडून ग्राहकांच्या दुरुस्तीसाठी ठेवलेल्या मोटारींसह विविध साहित्य असा एकूण ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील चिराग प्रकाश होले यांचे शेलापूर येथे मोटार रिवाइंडींगचे दुकान आहे. गुरुवारी (२५ जून) सायंकाळी दुकान बंद करताना दुरुस्तीसाठी आलेल्या ग्राहकांच्या मोटारी दुकानात ठेवून त्यांनी शटरला दोन्ही बाजूंनी कुलूप लावले होते. त्यानंतर ते दाताळा येथे गेले. शुक्रवारी (२६ जून) सकाळी शेजारील सायकल दुरुस्ती दुकानदार सिताराम सपकाळ यांनी दुकानाचे कुलूप तोडून शटर उघडे असल्याची माहिती फोनवर दिली. त्यानंतर चिराग होले यांनी तातडीने शेलापूर गाठले असता दुकानाचे कुलूप कापलेले व शटर अर्धवट उघडे दिसले. दुकानाची पाहणी केली असता दुरुस्तीसाठी ठेवलेल्या दोन ५ एचपी टेकस्मो मोटारी, दोन ३ एचपी मोटारी, दोन मोटर स्टेटर बाइंडिंग, पाच किलो जुनी तांब्याची तार तसेच एक जुनी पिठाची चक्की असा एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी चिराग प्रकाश होले यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५ व ३३४(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दिलीप तडवी करीत आहेत.