जळगाव जामोद :- जळगाव जामोद-वारी हनुमान महामार्गावरील अपूर्ण काम आणि रस्त्यावर साचलेल्या गिट्टीमुळे आणखी एका निष्पाप जीवाला आपला जीव गमवावा लागला. जामोद येथील ६५ वर्षीय दुर्गाबाई मुरलीधर जोशी यांचा दुचाकी घसरून झालेल्या गंभीर अपघातानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित यंत्रणांच्या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजता दुर्गाबाई जोशी या आपल्या नातवासोबत दुचाकीने जामोदहून सोनबर्डीकडे जात होत्या. जामोद येथील आश्रम शाळेजवळ रस्त्यावर पडलेल्या गिट्टीमुळे दुचाकीचा तोल गेला आणि त्या खाली कोसळल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तातडीने जळगाव जामोद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथील विदर्भ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच २५ जून रोजी रात्री सुमारे ८ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर २६ जून रोजी दुपारी ३ वाजता जामोद येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान, जळगाव जामोद-वारी हनुमान महामार्गाचे काम अनेक ठिकाणी अद्याप अपूर्ण आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गिट्टी व मुरूम टाकून काम अर्धवट सोडल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावर सातत्याने अपघात घडत असून अनेक जण जखमी झाले आहेत. तरीही संबंधित बांधकाम कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. या घटनेनंतर नागरिकांनी संबंधित बांधकाम कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागावर निष्काळजीपणाचा आरोप करत महामार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, धोकादायक ठिकाणी इशारा फलक लावावेत आणि आवश्यक सुरक्षाव्यवस्था उभारून भविष्यात अशा दुर्घटना टाळाव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे.