Headlines

शेतातील सोयाबीनची सुडी जाळली; चुलत भावावर संशय? शेतकऱ्याचे १.७५ लाखांचे नुकसान!

बुलढाणा : – तालुक्यातील डोंगरखंडाळा शिवारात अज्ञात व्यक्तीने शेतातील सोयाबीनची सुडी पेटवून दिल्याची घटना समोर आली असून, या आगीत शेतकऱ्याचे सुमारे १ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी चुलत भावावर संशय व्यक्त करत बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सदाशिव सुधाकर भगत (वय ३८, रा. डोंगरखंडाळा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या आई व बहिणीसोबत सामायिक मालकीची शेती असून, शिवार रस्त्याच्या कारणावरून चुलत भाऊ विनोद भीमराव भगत याच्याशी वारंवार वाद होत होते. या वादातून सुडी जाळून टाकण्याची धमकीही देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
यंदाच्या हंगामात शेतात पिकवलेले सोयाबीन काढणीनंतर सुमारे ३५ क्विंटल सुडी स्वरूपात ताडपत्रीखाली साठवून ठेवण्यात आले होते. ८ मे रोजी दुपारी सदाशिव भगत शेतात गेले असता त्यांना सुडीला आग लागलेली दिसून आली. धूर निघत असल्याचे पाहताच त्यांनी तातडीने कुटुंबीयांना माहिती दिली.
या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, संबंधित घटनेमागे चुलत भावाचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तक्रारीनंतर बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला असून, पुढील चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!