Headlines

शेतकऱ्यांना २० लिटर डिझेल कॅनमध्ये, वाहनधारकांनाही १ लिटर पेट्रोल देण्याची अजय टप यांची मागणी

मलकापूर : शेती मशागतीच्या हंगामात शेतकऱ्यांना डिझेलअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने त्यांना किमान २० लिटर डिझेल कॅनमध्ये उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच वाहनधारकांना १ लिटर पेट्रोल कॅनमध्ये देण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी तहसीलदार मलकापूर यांच्यामार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना ७ मे रोजी सादर केले.

            निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन तुटवड्याची शक्यता निर्माण झाली असून शासनाच्या निर्देशानुसार प्रशासनाने कॅनमध्ये पेट्रोल व डिझेल देण्यावर निर्बंध घातले आहेत. मात्र सध्या शेती मशागतीचे दिवस सुरू असल्याने ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणावर शेतीची कामे केली जात आहेत. अशावेळी ट्रॅक्टरमध्ये डिझेल संपल्यास शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

सध्या पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टर प्रत्यक्ष आणल्याशिवाय डिझेल दिले जात नसल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर टोचन लावून किंवा ओढत पंपापर्यंत न्यावे लागत आहे. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे शेतीच्या कामांचा विचार करून शेतकऱ्यांना किमान २० लिटर डिझेल कॅनमध्ये देण्याची मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच वाहनधारकांनाही पेट्रोल कॅनमध्ये उपलब्ध होत नसल्याने दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यात बंद पडण्याच्या घटना वाढत आहेत. अनेकांना वाहने लोटत किंवा टोचन लावून पेट्रोल पंपापर्यंत न्यावी लागत असल्याने नागरिकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी अजय टप यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!