बुलढाणा:- जगात येऊन डोळे उघडण्यापूर्वीच जणू नियतीने एका निष्पाप जीवाचा प्रवास संपवला. ज्या हातांनी या नवजात बाळाला मायेने कुशीत घ्यायला हवे होते, त्याच जगात त्याचा मृतदेह तलावाच्या काठावर आढळून आल्याने माणुसकीला काळिमा फासणारी घटना बुलढाणा शहरात उघडकीस आली आहे. अवघ्या एक ते दोन दिवसांच्या या अर्भकाला अशा अवस्थेत सोडून जाणाऱ्या निर्दयी व्यक्तीचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे. शहरातील धाड रोड परिसरातील टीबी तलावाजवळ एका अनोळखी नवजात बालकाचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. १५ नोव्हेंबर रोजी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. अवघ्या एक ते दोन दिवसांपूर्वी या बालकाचा जन्म झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. जन्मानंतर जग पाहण्याची, आईच्या कुशीत विसावण्याची आणि मायेचा स्पर्श अनुभवण्याची संधीही न मिळालेल्या या निष्पाप जीवाचा मृतदेह तलावाच्या काठावर आढळल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टीबी तलाव परिसरातील तलावाच्या काठाजवळ नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आला. अज्ञात व्यक्तीने बालकाचा जन्म लपविण्याच्या उद्देशाने आवश्यक कायदेशीर सोपस्कार न करता मृतदेह गुप्तपणे तलाव परिसरात टाकून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या घटनेची माहिती समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली. एका निष्पाप जीवाच्या मृत्यूमागे नेमके काय कारण आहे, त्याचा जन्म कोणत्या परिस्थितीत झाला आणि त्याला अशा अवस्थेत सोडून जाण्यामागे कोणाचा हात आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात अप. क्र. ११३०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ९४ अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस फौजदार नामदेव खवले (ब.नं. १०३७) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे./दरम्यान, मृत नवजात अर्भकाच्या नातेवाईकांचा तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या निष्पाप बालकाच्या मृत्यूमागील नेमके वास्तव तपासातून समोर येणार असले, तरी जन्माला येऊन अवघे एक-दोन दिवस झालेल्या जीवाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.