खामगाव :- शेतातील शेणखत पांगविण्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद जुना धुऱ्याचा वाद उकरून काढत थेट मारहाणीपर्यंत पोहोचला. हिवरखेड येथे एका शेतकऱ्यावर काठी व कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली असून, या प्रकरणी तिघांविरुद्ध हिवरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दादाराव गोविंदा पारखे (वय ५५, रा. हिवरखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमा पुंजाजी शिंगाडे, मंगेश सोमा शिंगाडे व गजानन सोमा शिंगाडे (रा. हिवरखेड) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी व आरोपी यांची शेती एकमेकांच्या शेजारी असून, शेताच्या धुऱ्याच्या कारणावरून त्यांच्यात पूर्वीपासून वाद असल्याचे समोर आले आहे. ८ जून रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास दादाराव पारखे हे शेतात काम करत असताना आरोपी तेथे आले. “आमच्या शेतात शेणखत का पांगवतो?” असा जाब विचारत त्यांनी वाद घातला. त्यानंतर जुन्या धुऱ्याच्या वादाचा मुद्दा पुढे करत शिवीगाळ करण्यात आली. वाद चिघळल्यानंतर आरोपींनी काठी व कुऱ्हाडीच्या साहाय्याने मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 351(2), 351(3), 352 व 3(5) अन्वये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचारी राजपूत यांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोहेकॉ प्रवीण जाधव करीत आहेत.