मलकापूर : शहरात आढळून आलेल्या सुमारे ४५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने मलकापूर शहर पोलिसांनी मर्ग दाखल करून तपास सुरू केला करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १० जून रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजताच्या दरम्यान खुशाल सुरजमल भंसाली व ओमप्रकाश सतीश भट्टड यांनी एका अनोळखी व्यक्तीला मृत अवस्थेत मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर संबंधित इसमाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. मात्र, त्याच्या मृत्यूमागील कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपजिल्हा रुग्णालयातील कक्षसेवक संतोष कडू गवळी यांनी दिलेल्या मेमोवरून मलकापूर शहर पोलिसांनी मर्ग क्रमांक ३४/२०२६ अन्वये कलम १९४ बीएनएसएस अंतर्गत नोंद केली आहे. मृत इसमाचे वय अंदाजे ४५ वर्षे असून त्याचा बांधा सडपातळ आहे. अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट, निळ्या रंगाचे बनियन व काळ्या रंगाची पँट होती. तसेच त्याचे केस काळे आणि दाढी काळी-पांढरी मिश्रित असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास किंवा त्याची ओळख पटत असल्यास तात्काळ मलकापूर शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम बरदाडे करीत आहेत.