मलकापूर : कॉलेजला जाते असे सांगून घरातून निघालेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना मलकापूर शहरात समोर आली आहे. घरातून निघताना ती ६० हजार रुपये घेऊन गेल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले असून, अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फुकटपुरा, विष्णुनगर येथील श्रीकृष्ण राजाराम ठोसरे यांनी याबाबत मलकापूर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास त्यांची मुलगी कु. स्नेहल श्रीकृष्ण ठोसरे (वय २२) हिने शहरातील नांदुरा रोडवरील भाऊसाहेब गायकवाड कॉलेजला जात असल्याचे सांगितले आणि घरातून बाहेर पडली. यावेळी ती घरातील ६० हजार रुपये सोबत घेऊन गेली होती. स्नेहल घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा नातेवाईक तसेच इतर ठिकाणी शोध घेतला. मात्र, शोध घेऊनही ती आढळून आली नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी फूस लावून तिचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करीत ठोसरे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, बेपत्ता तरुणीचा शोध घेण्यासह प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.