खामगाव : नदीपात्रातून अवैधरित्या रेती उत्खनन करून तिची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध वनविभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मोताळा वनपरिक्षेत्रातील पूर्व कोथळी परिसरात सापळा रचून रेतीची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडण्यात आले. या कारवाईत ट्रॅक्टरसह ६० घनफूट रेती व अन्य साहित्य असा एकूण ६ लाख ५३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. खामगाव मोताळा वनपरिक्षेत्रांतर्गत पूर्व कोथळी परिसरातून अवैध उत्खनन करून रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती वनविभागाच्या फिरते पथकाला मिळाली होती. त्यानुसार ८ ऑगस्ट रोजी पथकाने सापळा रचून ट्रॅक्टर क्र. एमएच २८ सीसी ३८६३ पकडले. ट्रॅक्टरमधून ६० घनफूट अवैध रेती, ३ टोपले, ३ फावडे व लोखंडी चाळणी असा मुद्देमाल आढळून आला. ट्रॅक्टरसह जप्त करण्यात आलेल्या या मुद्देमालाची एकूण किंमत ६ लाख ५३ हजार १०० रुपये असल्याचे वनविभागाने सांगितले. याप्रकरणी कोथळी, ता. मोताळा येथील हमीद शहा हारुण शहा याच्याविरुद्ध विविध कलमान्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई खामगाव फिरते पथकातील वनपरिक्षेत्र अधिकारी यु. आर. राऊत, पोहेकॉ सुनील जाधव, वनरक्षक आर. जी. अढाव व वाहनचालक रोहीदास आडे यांनी केली. उपवनसंरक्षक जमीन मुनीर शेख, प्रादेशिक वनविभाग, बुलढाणा तसेच विभागीय वन अधिकारी, दक्षता विभाग, अमरावती येथील कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.