Headlines

चिखली-जालना महामार्गावरील धोकादायक वळण ठरले मृत्यूचा सापळा! भीषण अपघातात ४७ वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू

चिखली : महामार्गावरील धोकादायक वळणे वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. चिखली-जालना महामार्गावरील भानखेडा फाटा ते बेराळा फाट्यादरम्यान असलेल्या धोकादायक वळणावर झालेल्या भीषण अपघातात ४७ वर्षीय वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला. रविवार, ९ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वारंवार अपघातांना कारणीभूत ठरणारी ही दोन्ही वळणे सरळ करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.
मृताचे नाव विनोद तुकाराम कऱ्हाडे (वय ४७, रा. रामानंद नगर, चिखली) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विनोद कऱ्हाडे हे पत्नीला शेतातून आणण्यासाठी जात असताना भानखेडा ते बेराळा फाट्यादरम्यान असलेल्या धोकादायक वळणावर त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले; मात्र या अपघातात विनोद कऱ्हाडे यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *