मलकापूर : नांदुरा तालुक्यातील काटी येथे घरफोडीच्या प्रयत्नाला विरोध करणाऱ्या ५२ वर्षीय रायसिंग सिताराम सोळंकी यांच्या हत्या प्रकरणाने अखेर तपासात महत्त्वाची वळण घेतले आहे. घटनेनंतर तब्बल १७ दिवसांनी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणातील दोन संशयितांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याने या प्रकरणातील तपासाकडे आता लक्ष लागले आहे.
काटी गावात ९ ऑगस्टच्या रात्रीच्या सुमारास काहीजण घरफोडीच्या उद्देशाने शिरल्याचा प्रकार घडला होता. संशयास्पद हालचाली लक्षात आल्यानंतर रायसिंग सोळंकी यांनी चोरट्यांना हटकण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या सोळंकी यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे काटीसह परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी निलेश शिवराम सोळंके यांच्या फिर्यादीवरून मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनासह घरफोडीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी विविध दिशांनी तपास सुरू केला. तांत्रिक माहिती तसेच मिळालेल्या गोपनीय धाग्यांच्या आधारे तपास पुढे नेत अखेर २५ ऑगस्ट रोजी संतोष शिवबासअप्पा पवार (२५, रा. लालगोटा मदापुरी, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) आणि दिनेश तुकाराम चव्हाण (२५, रा. डेबुजी नगर, राहटगाव, जि. अमरावती; सध्या रा. पूर्णाळ फाटा, ता. मुक्ताईनगर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन्ही संशयितांना २६ ऑगस्ट रोजी मलकापूर न्यायालयात हजर करण्यात आले. प्रकरणाचे गांभीर्य, गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध आणि पुढील तपासासाठी पोलिस कोठडीची आवश्यकता असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने दोघांनाही ३१ ऑगस्टपर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. दरम्यान, या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. अटकेतील संशयितांकडून या गुन्ह्याबाबत आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.