भरधाव क्रूझरवरील चालकाचे नियंत्रण सुटले; वाहन पलटी होऊन १४ बालके जखमी

देऊळगाव राजा : शाळकरी वयातील बालकांचा प्रवास अचानक अपघातात बदलला आणि भरधाव वेगाने धावणारी क्रूझर गाडी रस्त्यावर उलटली. या दुर्घटनेत तब्बल १४ बालके जखमी झाली. ही घटना २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास देऊळगाव मही परिसरात घडली. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप असून, याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, सूरज बंसीधर ठेंगणकर (रा. देऊळगाव मही, ता. देऊळगाव राजा) हा एमएच २१ बीएफ ०६३५ क्रमांकाची क्रूझर गाडी चालवत होता. देऊळगाव मही येथून पूर्वेकडे सुमारे २० किलोमीटर अंतरावर जात असताना त्याने वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविल्याने गाडीवरील नियंत्रण सुटून ती रस्त्यावर पलटी झाली. या अपघातामुळे वाहनातील बालकांमध्ये एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेत सिद्धेश अनिलेश्वर पवार (वय ११), आर्यन अमोल झिने (वय ८), परवेश हिरा पवार (वय ९) आणि रिया कैलास भोसले (वय ७) हे चार बालक जखमी झाले. ते सर्व वाकी बु. व वाकी खुर्द येथील रहिवासी आहेत. याशिवाय अन्य दहा बालकांनाही किरकोळ दुखापती झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी वाकी बु. येथील पवनर म्हलारी भोसले (वय २६) यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी क्रूझर चालक सूरज बंसीधर ठेंगणकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ) आणि १२५ (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास देऊळगाव राजा पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *