*मलकापूर(प्रतिनिधी):* संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने पर्यावरण संरक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘वननेस वन – निसर्गासोबत समरसता’ या अभियानाच्या सहाव्या टप्प्याचे आयोजन मलकापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज नगर समशान भूमी या ठिकाणी मलकापूर नगरपालिकेचे उपाध्यक्ष श्री अनिल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले, तसेच मलकापूर ब्रांच मुखी आदरणीय दयाळूजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मिशनच्या जेष्ठ प्रचारकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता, सदर वृक्षारोपण हे देशभरातील ग्रामीण तसेच शहरी भागांतील ६५० ठिकाणी एकाच वेळी वृक्षारोपण करण्यात आले. या अभियानात मिशनचे लाखो श्रद्धाळू आणि स्वयंसेवक यांनी पूर्ण समर्पित भावनेने सहभाग घेत सुमारे ५.५ लाख रोपांची लागवड केली.
सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या पावन आशीर्वादाने आयोजित करण्यात आलेल्या या महाअभियानाला बाबा हरदेव सिंह जी यांच्या दिव्य संदेशाची प्रेरणा आहे — ‘प्रदूषण आत असो किंवा बाहेर, दोन्हीही हानिकारक आहे.’ हा संदेश केवळ पर्यावरण संवर्धनाचे आवाहन करणारा नसून, मानवी चेतना निर्मळ करण्यास तसेच निसर्गाप्रती जबाबदार बनण्यास प्रेरणा देणारा आहे.
संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय जोगिंदर सुखीजा जी यांनी सांगितले की, ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू झालेल्या या अनोख्या उपक्रमाने आज देशव्यापी जनआंदोलनाचे स्वरूप धारण केले आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये आतापर्यंत ६५० हून अधिक ‘वननेस वन’ स्थळांवर श्रद्धाळू आणि सेवादार पूर्ण समर्पित भावनेने या वृक्षांचे संरक्षण व संवर्धन मिशन करीत आहेत.
या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे मिशन केवळ रोपांची लागवड करण्यापुरती आपली जबाबदारी मर्यादित ठेवत नाही, तर ही रोपे मोठी होऊन वृक्ष बनेपर्यंत त्यांचे सातत्याने संरक्षण करण्याचा संकल्पही पूर्ण करते. प्रत्येक रोपाची तीन ते पाच वर्षांपर्यंत नियमित देखभाल केली जाते, जेणेकरून त्यांची योग्य वाढ होऊन ते घनदाट लघुवनांचे स्वरूप धारण करतील, जैवविविधता समृद्ध करतील, स्थानिक परिसंस्थेला बळकटी देतील आणि भावी पिढ्यांना स्वच्छ व हिरवेगार वातावरण उपलब्ध करून देतील.