मेहकर : समृद्धी महामार्गावर नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्स बसचा अपघात होऊन एका २९ वर्षीय प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर चार प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही घटना २५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास मेहकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चॅनल क्रमांक २९६.०५ येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हल्स बस (क्र. MH 09 GJ 7315) नागपूरहून मुंबईकडे जात असताना चालकाने समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बसची धडक बसून चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस लोखंडी डिव्हायडरला धडकली. या अपघातात गौरव शरदचंद्र पांडे (वय २९, रा. तुमसर, जि. भंडारा) हे बसमधून बाहेर फेकले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर चार प्रवासी जखमी झाले. महामार्ग पोलीस व मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ खळबळ उडाली होती.