खामगाव : शेतीच्या धुऱ्याच्या जुन्या वादाला पुन्हा तोंड फुटल्याने पारखेड येथे दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. यावेळी एकमेकांवर दगडाने हल्ला केल्याने दोन्ही बाजूंचे दोघे जखमी झाले. ही घटना २५ सप्टेंबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटांतील संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
आशा बळीराम डोबे (३८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भानुदास शालीग्राम वांढे यांनी शिवीगाळ केल्यानंतर याबाबत जाब विचारण्यासाठी ओम डोबे गेले होते. त्यावेळी वाद वाढून भानुदास वांढे यांनी ओम डोबे यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना जखमी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीवरून भानुदास वांढे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, निळकंठ भानुदास वांढे (२९) यांनी दिलेल्या स्वतंत्र तक्रारीनुसार, ओम डोबे यांनी भानुदास वांढे यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना जखमी केले. या तक्रारीवरून पोलिसांनी ओम डोबे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. शेतीच्या धुऱ्याच्या वादातून झालेल्या या प्रकाराचा पुढील तपास पोलिस अंमलदार किरण राऊत करीत आहेत.