Headlines

युरियाची विषबाधा ठरली बैलजोडीच्या जीवावर; शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर!

किनगावराजा : आधीच नैसर्गिक संकटांशी सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबावर आणखी एक संकट कोसळले आहे. शेतात ठेवलेले युरिया खत खाल्ल्याने शेतकऱ्याची लाखमोलाची बैलजोडी दगावल्याची दुर्दैवी घटना ११ नोव्हेंबर रोजी पिंपळगाव लेंडी येथे घडली. या घटनेमुळे गायके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पिंपळगाव लेंडी येथील शेतकरी रवींद्र बाळासाहेब गायके यांच्या गणेशा आणि जलशा या बैलजोडीने शेतात ठेवलेले युरिया खत खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी उपचारासाठी प्रयत्न केले; मात्र दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, ही बैलजोडी शेतीच्या कामासाठी अत्यंत महत्त्वाची होती. मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेतलेले असताना आता शेतीचा आधारही हरपल्याने रवींद्र गायके हतबल झाले आहेत. तलाठ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, पीडित शेतकरी कुटुंबाला शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *