मलकापूर : शहरातील शाळांच्या परिसरात सुरू असलेल्या तंबाखू विक्रीवर अखेर पोलिसांनी कारवाई करत एका विक्रेत्याला ताब्यात घेतले. यामध्ये एकूण ३१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २० एप्रिल रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास पांढरी प्लॉट पारपेठ येथील राबिया स्कूलसमोर आरोपी शेख अजीम शेख बशीर कुरेशी (वय २५, रा. कुरेशी नगर) हा तंबाखू व बिडी विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ धाड टाकली. धाडीत आरोपीकडून उंट बिडीचे ८ बंडल, गुलाब तंबाखू १० नग व गाय छाप तंबाखू १२ नग असा एकूण ३१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश रमेश बरडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध कोफ्ता कायद्याअंतर्गत कलम ६ व २४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुपेश झाल्टे करीत आहेत.