दारूच्या नशेत पत्नीला बेदम मारहाण; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

शेगाव : दारूच्या नशेत पत्नीला अमानुष मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना शेगाव शहरातील पंचशील नगर परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी जखमी महिलेच्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. शालीनी सुनिल गवारगुरु (वय ४०, रा. पंचशील नगर, शेगाव) या मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ७ मे रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास त्या कामावरून घरी परतल्या असता त्यांचे पती सुनिल गवारगुरु हे दारूच्या नशेत घरी आले होते. पत्नीने दारू पिण्याबाबत विचारणा केल्याने दोघांमध्ये वाद झाला. यानंतर बचतगटाचे पैसे भरण्यासाठी फिर्यादी यांनी पतीकडे पैशांची मागणी केली असता आरोपीने पैसे देण्यास नकार देत शिवीगाळ केली. वाद वाढल्यानंतर आरोपीने पत्नीच्या नाकावर, डोक्यावर व तोंडावर जोरदार बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच खाली पडल्यानंतरही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. जखमी महिलेला त्यांच्या बहिणी व मुलींनी उपचारासाठी शेगाव येथील रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जखमी महिलेचा जबाब नोंदविण्यात आला असून वैद्यकीय अहवालाच्या आधारे शेगाव शहर पोलीसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!