मलकापूर : कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळत विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारा एक तरुण शिक्षक अखेर काळाच्या पडद्याआड गेला. न्यायालयीन कामासाठी मलकापूरकडे येत असताना झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या ३६ वर्षीय भूषण मुळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शहरासह शैक्षणिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. मलकापूर शहरातील जुन्या गाव परिसरातील नसवाला चौक येथे राहणारे भूषण रविंद्र मुळे हे चिखली येथील आदर्श विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. शांत, मनमिळावू आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या भूषण यांना १६ मे रोजी न्यायालयीन कामासाठी मलकापूर येथे यायचे होते. त्यासाठी ते १५ मेच्या रात्री दुचाकीने मलकापूरकडे निघाले होते. दरम्यान, मोताळा तालुक्यातील शेलापूरजवळ असलेल्या रूद्र पेट्रोल पंप परिसरात रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीचा समोर जात असलेल्या दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात भूषण मुळे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना मलकापूर येथील आयुष्यमान हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र प्रकृती अधिक चिंताजनक बनल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा सल्ला दिला. तेथे वैद्यकीय पथकाने शर्थीचे प्रयत्न केले, पण अखेर १६ मेच्या रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. भूषण मुळे यांच्या निधनाची बातमी समजताच मलकापूर शहरावर शोककळा पसरली. शिक्षक म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली होती. त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मित्रपरिवार आणि शैक्षणिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी मलकापूर येथे अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.