मलकापूर :- शहरातील बुलढाणा रोडवर सुरू असलेल्या रस्ता दुभाजकाच्या कामामध्ये गौरक्षण संस्थानच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कट ठेवण्यात यावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
प्रहार संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बुलढाणा रोडवरील रस्ता दुभाजक निर्मितीचे काम सध्या सुरू असून रस्त्याच्या एका बाजूला गौरक्षण संस्थान कार्यरत आहे. संस्थेमध्ये सुमारे ३०० हून अधिक गायी व इतर जनावरे आहेत. या जनावरांना दररोज चारण्यासाठी शहराबाहेरील परिसरात नेले जाते. त्यामुळे जनावरांची सुरक्षित आणि सुलभ ने-आण करण्यासाठी गौरक्षण संस्थानसमोर रस्ता दुभाजकात कट असणे अत्यावश्यक आहे. संघटनेच्या मते, कट नसल्यास जनावरांना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नेण्यासाठी मोठा फेरा मारावा लागेल. यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता असून अपघाताचा धोकाही वाढू शकतो. याशिवाय गौरक्षण संस्थानमध्ये कुट्टी व इतर खाद्यसाहित्य घेऊन येणाऱ्या वाहनांची नियमित ये-जा सुरू असते. दुभाजकात कट असल्यास या वाहनांनाही सहजपणे प्रवेश मिळू शकेल. गौरक्षणमधील गौमाता व इतर जनावरांच्या हिताचा विचार करून तसेच भविष्यात कोणतीही वाहतूक समस्या निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास गौरक्षण संस्थानसमोरील रस्ता दुभाजकावरच लवकरच चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रहार संघटनेने दिला आहे. निवेदन सादर करताना जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्यासह आशिष माहुरकर, दिपक कपले, दिपक चवरे, बलराम बावस्कार, राहुल संचेती, राजकुमार बाहेती, पंकज टावरी, मिलिंद काबरा, मयूर चौधरी, राजू भटेजा, शेख मोहम्मद, करण नायसे, शुभम निवाणे, सतीष दाने, रविंद्र बाम्हंदे, अशोक गाढवे, श्रीकृष्ण सातव, निलेश चोपडे, अॅड. प्रभाकर म्हैसागर, राजू पुनेकर, श्रीकृष्ण तायडे, किशोर सोनोने, शालीकराम पाटील, अमोल टप, बबलू बैरागी यांच्यासह गौसेवक व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.