मेरा बु. :- तालुक्यातील रोहडा येथील २१ वर्षीय तरुणी घरातून अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध करूनही तिचा ठावठिकाणा न लागल्याने पोलिसांनी नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहडा येथील रहिवासी शेख इरफान शेख नजीर (वय २८) यांनी ८ जून रोजी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, ७ जून रोजी रात्री कुटुंबातील सर्व सदस्य नेहमीप्रमाणे घरात झोपले होते. मात्र, ८ जून रोजी पहाटे घरातील महिलांना जाग आल्यानंतर संबंधित तरुणी घरात नसल्याचे निदर्शनास आले. यानंतर कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरात सर्वत्र शोध घेतला. मात्र, तरुणीचा कुठेही शोध लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी अंढेरा पोलीस ठाणे गाठून हरवल्याची तक्रार नोंदविली. बेपत्ता तरुणीचे वर्णन असे आहे की, तिचा रंग गोरा असून उंची सुमारे ४.५ फूट आहे. तिचे केस लांब व काळे आहेत. ती हिंदी भाषा बोलते. बेपत्ता होताना तिच्या अंगात पांढऱ्या रंगाचा टॉप व पांढऱ्या रंगाची लेगिन्स होती. कानात पिवळ्या धातूचे बारीक कापसे असून नाकावर तीळ आहे. या वर्णनाची तरुणी कोणाला दिसून आल्यास अथवा तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ अंढेरा पोलीस ठाण्याशी किंवा ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.