शेगाव : शेगाव-खामगाव मार्गावरील माऊली वॉटर पार्कजवळ भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत ५३ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याने शेगाव ग्रामीण पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशंकर तुळशीराम झाडे (वय ५३, रा. नवा अंदुरा, ता. बाळापूर) हे आपल्या दुचाकीने (एमएच-३०-एन-९७३०) शेगावहून खामगावकडे जात होते. दुपारी सुमारे १२.४५ वाजताच्या सुमारास माऊली वॉटर पार्कपासून पुढे खामगाव रोडवर समोरून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारने (एमएच-२३-एएस-००९०) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की शिवशंकर झाडे यांना गंभीर दुखापत झाली. अपघातात त्यांचा मृत्यू झाला असून दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर कार चालकाने जखमींना मदत न करता तसेच पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी मृतकाचे पुतणे अनिकेत नागोराव झाडे (वय २९, रा. नवा अंदुरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघात क्रमांक १८०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६(१) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १३४ व ३(१)/१८१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील करीत आहेत.