मलकापूर : म्हैसवाडी येथील प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजनेतील कथित अनियमिततेविरोधात शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे यांनी केलेल्या दोन तासांच्या ठिय्या आंदोलनाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, रखडलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना दिलासा मिळाला असून, विजय साठे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची चर्चा होत आहे. म्हैसवाडी येथील अनेक लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण करूनही दुसरा हप्ता मिळाला नसल्याची बाब समोर आली होती. विशेष म्हणजे, त्यानंतर काम सुरू केलेल्या काही लाभार्थ्यांना निधी मिळाल्याचे, तर काही अपात्र व्यक्तींनाही योजनेचा लाभ देण्यात आल्याचे आरोप करण्यात आले होते. यामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे यांनी लाभार्थ्यांच्या वतीने पंचायत समिती मलकापूर येथे ठिय्या आंदोलन छेडले. संबंधित कागदपत्रे, लाभार्थ्यांच्या नोंदी आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे त्यांनी प्रशासनासमोर प्रश्नांची सविस्तर मांडणी केली. “ज्यांनी आधी घरकुल पूर्ण केले, त्यांनाच हप्त्यापासून वंचित का ठेवण्यात आले?” असा थेट सवाल करत त्यांनी योजनेच्या अंमलबजावणीतील विसंगतीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. विजय साठे यांच्या अभ्यासपूर्ण आणि पुराव्यानिशी मांडलेल्या भूमिकेची प्रशासनालाही दखल घ्यावी लागली. संबंधित अधिकाऱ्यांनी रखडलेली प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर काही लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांची प्रकरणेही येत्या आठवडाभरात निकाली काढण्यात येतील, अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
अभ्यासपूर्ण पाठपुराव्यामुळे लाभार्थ्यांचा वाढला विश्वास ग्रामस्थांच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करून पुराव्यांच्या आधारे प्रशासनासमोर ठाम भूमिका मांडणे, ही विजय साठे यांची कार्यशैली ठरत असल्याची भावना लाभार्थ्यांकडून व्यक्त होत आहे. आंदोलनानंतर निधी वितरणाला गती मिळाल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले असून, उर्वरित प्रकरणेही तत्काळ निकाली न निघाल्यास अधिक तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.