Headlines

बकरीच्या पैशांवरून हत्या; पाडळी शिंदेत व्यक्तीचा खून; मृताच्या मुलीचा शेजारील व्यक्तीवर संशय

देऊळगाव राजा : तालुक्यातील पाडळी शिंदे येथे बकरीच्या पैशांवरून झालेल्या वादातून एका व्यक्तीचा डोक्यात कठीण वस्तूने वार करून खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या खळबळजनक घटनेत मृत महेंद्र तुकाराम मोरे यांच्या मुलीने अंडेरा पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार देत शेजारील व्यक्तीवर संशय व्यक्त केला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
तक्रारदार सौ. प्रियांका राहुल खरात (रा. पिंपळगाव, ता. जि. जालना) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे वडील महेंद्र तुकाराम मोरे हे पाडळी शिंदे येथे राहत होते. काही दिवसांपूर्वी गावातील एका व्यक्तीची बकरी विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने मृत्यूमुखी पडल्याचा दावा करण्यात आला होता. या घटनेची नुकसानभरपाई म्हणून संबंधित व्यक्तीने महेंद्र मोरे यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान, ५ ऑगस्ट रोजी सकाळी नातेवाईकांचा फोन आल्यानंतर प्रियांका खरात पाडळी शिंदे येथे पोहोचल्या असता त्यांचे वडील घरासमोर रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या डोक्यावर गंभीर मारहाणीच्या जखमा होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी पाठविला. तक्रारीत ४ ऑगस्टच्या रात्री ते ५ ऑगस्टच्या पहाटेदरम्यान संबंधित व्यक्तीने साथीदाराच्या मदतीने महेंद्र मोरे यांच्या डोक्यावर कठीण वस्तूने वार करून त्यांचा खून केला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, खुनाचे नेमके कारण व आरोपींची भूमिका तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे, ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी, उपस्थित होते. अंडेरा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!