मलकापूर : परीक्षेसाठी घरातून बाहेर पडलेली १८ वर्षीय तरुणी घरी परतलीच नाही. बराच वेळ वाट पाहूनही मुलगी घरी न आल्याने कुटुंबीयांनी तिचा मित्रमैत्रिणींसह नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, तिचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. अखेर मुलीच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. बळीराम समाधान सोनोने (रा. बहापुरा, ता. मलकापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची १८ वर्षे ५ महिने वयाची मुलगी २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता बहापुरा येथून एसटी बसने मलकापूर येथे पेपर देण्यासाठी गेली होती. मात्र, परीक्षा देण्यासाठी घरातून गेलेली मुलगी त्यानंतर घरी परतली नाही. मुलगी घरी न आल्याने वडिलांनी तिच्या मैत्रिणी, नातेवाईक तसेच इतर ठिकाणी शोध घेतला. सर्वत्र शोध घेऊनही मुलगी मिळून न आल्याने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तिचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अप. नं. ८८९/२०२६, कलम १४०(३) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.