Headlines

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पती व सासूविरुद्ध गुन्हा; ५ लाखांच्या मागणीसाठी मारहाण, धमक्या; विवाहितेला घराबाहेर काढल्याचा आरोप

शेगाव : कमी हुंडा व सोनं दिल्याचा आरोप करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती आणि सासूविरुद्ध शेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहेरहून ५ लाख रुपये आणण्याची मागणी करत मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या देणे तसेच घराबाहेर काढल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. पल्लवी राहुल दाणे (वय ३४, सध्या रा. ज्ञानेश्वरी नगर, अकोट रोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अप. नं. २९७/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, ११५(२), ३५१(२), ३(५) तसेच हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१ चे कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी राहुल काशिनाथ दाणे (वय ३९) व उषा काशिनाथ दाणे (वय ५७, दोघे रा. एन. एम. २२३, डब्ल्यु.सी.एल., शक्तीनगर, दुर्गापूर कॉलनी, चंद्रपूर) असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तक्रारीनुसार, फिर्यादीचा आरोपींसोबत पुनर्विवाह झाला होता. लग्नानंतर सासू उषा दाणे यांनी “लग्नात कमी हुंडा व कमी सोनं दिलं” असे म्हणत सतत टोमणे मारून मानसिक त्रास दिला. तसेच आरोपींनी माहेरहून ५ लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा वारंवार छळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. फिर्यादीने विरोध केल्यास आरोपींनी हात पिरगळणे, केस पकडून ओढणे, मारहाण करणे तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. उपचारासाठी दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांना काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही आरोपींकडून देण्यात आल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.
सततच्या छळामुळे जीवाला धोका निर्माण झाल्याने आरोपींनी घराबाहेर काढल्यामुळे सध्या माहेरी राहावे लागत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ रामदास गट्टे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!