मलकापूर : – तालुक्यातील देवधाबा येथील कमर्दीपुर शिवारात शेतीजवळील वीजतारा धोकादायकरीत्या खाली लोंबकळत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या समस्येकडे महावितरणकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. माहितीनुसार, कमर्दीपुर शिवारातील गट क्रमांक ४० व ४४ मधील दोन वीज खांबांमधील अंतर वाढल्याने खांब झुकले असून, विद्युत तारा थेट जमिनीच्या जवळ आल्या आहेत. त्यामुळे शेतात मशागत करताना मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकरी श्रीकृष्ण लांडगे व संदीप लांडगे यांनी यापूर्वी अनेकदा लाईनमन व संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्याचे सांगितले. तसेच लेखी अर्जही देण्यात आले; मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. दरम्यान, शेतकऱ्यांनी ही बाब शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसह महावितरणचे अभियंता शेख व खान यांची भेट घेतली. दोन दिवसांत वीजतारा व्यवस्थित करून झुकलेले खांब सरळ न केल्यास महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी शिवसेना शहरप्रमुख हरिदास गणबास, उपशहरप्रमुख बाळू पोलाखरे, संदीप लांडगे, विश्वनाथ पुरकर, संतोष लांडगे, योगेश लांडगे, मोहसीन यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.