विनापरवाना पेट्रोल साठ्यावर डोणगाव पोलिसांचा छापा; २७० लिटर इंधन जप्त

डोणगाव : अंजनी बु. (ता. मेहकर) येथे विनापरवाना पेट्रोलचा साठा करून त्याची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर डोणगाव पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत २७० लिटर पेट्रोलसह एकूण ३४ हजार २६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपनीय माहितीच्या आधारे २६ जुलै रोजी अंजनी बु. येथील भागवत रामदास लाड (वय २५) यांच्या घरावर पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला. तपासणीदरम्यान कोणतीही वैध परवानगी नसताना विक्रीसाठी साठवून ठेवलेले २७० लिटर पेट्रोल तसेच आठ प्लास्टिक कॅन आढळून आले.
पोलिसांनी घटनास्थळावरील संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमाच्या कलम ३ व ७ अन्वये डोणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणेदार गणेश इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. बेकायदेशीर इंधनसाठा आणि विनापरवाना विक्री करणाऱ्यांविरोधात अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!