डोणगाव : एकत्र फिरणारे, एकत्र हसणारे आणि कायम एकमेकांच्या सोबत असलेले दोन जिवलग मित्र नियतीच्या एका भीषण अपघाताने कायमचे दूर झाले. मेहकरकडे दुचाकीने निघालेल्या डोणगावातील दोन तरुणांचा कंटेनरच्या जोरदार धडकेत मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी (दि. २) रात्री साडेसात ते पावणेआठच्या सुमारास जालना बायपास ते पुलगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ सी वर घडली. शेख साहिल शेख जफर आणि शेख शाकिब शेख शकील कुरेशी अशी मृत तरुणांची नावे आहेत. दोन जिवलग मित्रांचा एकाच वेळी झालेला मृत्यू आणि दुसऱ्या दिवशी जवळपास एकाच वेळी निघालेल्या त्यांच्या अंत्ययात्रांनी संपूर्ण डोणगावावर शोककळा पसरली. डोणगावातील लक्ष्मीनगर परिसरात राहणारे साहिल आणि शाकिब हे बुधवारी रात्री दुचाकीने (टीएन ०१ ईजी १४७६) मेहकरकडे जात होते. डोणगावजवळील महामार्गावरील पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला मेहकरकडून येणाऱ्या कंटेनरने (एनएल ०१ एससी ३९८२) जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दोघेही रस्त्याखाली फेकले गेले. गंभीर जखमी झालेल्या दोन्ही मित्रांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर मेहकरकडून डोणगावकडे येणारे अमोल धोटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, साहिल आणि शाकिब यांच्या मृत्यूची वार्ता डोणगावात पोहोचताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. गुरुवारी (दि. ३) दुपारी अडीचच्या सुमारास दोघांच्याही अंत्ययात्रा जवळपास एकाच वेळी निघाल्या. आयुष्यभर एकमेकांच्या सुख-दुःखात सोबत राहिलेल्या या जिवलग मित्रांना नियतीने मृत्यूनंतरही एकाच वेळी अखेरचा निरोप दिल्याचे हृदयस्पर्शी दृश्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले. मोठ्या संख्येने नागरिकांनी दोघांच्या अंत्ययात्रेत सहभागी होत अखेरचा निरोप दिला. दोन तरुण मित्रांचा एकाच अपघातात झालेला अंत आणि त्यानंतर एकाच वेळी पार पडलेला दफनविधी पाहून संपूर्ण डोणगाव सुन्न झाले होते.