Headlines

झोपेच्या डुलकीने घेतला चालकाचा जीव; समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात

डोणगाव : पहाटेच्या सुमारास वाहन चालविताना चालकाला लागलेली झोपेची डुलकी जीवावर बेतली. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून समोरून जाणाऱ्या अज्ञात वाहनाला मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत क्लीनर किरकोळ जखमी झाला असून ट्रकच्या कॅबिनचा अक्षरशः चुराडा झाला. समृद्धी महामार्गावरील डोणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत नागपूर कॉरिडॉरवरील चैनेज क्रमांक २६९.४० येथे ४ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे ५ वाजता हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान पासिंगचा ट्रक क्रमांक आरजे-११-जीडी-४४१२ मुंबईहून नागपूरच्या दिशेने समृद्धी महामार्गावरून जात होता. पहाटेच्या वेळी चालकाला अचानक झोपेची डुलकी लागल्याने ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी समोरून जाणाऱ्या अज्ञात वाहनाला ट्रकने मागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की ट्रकच्या कॅबिनचा पूर्णपणे चुराडा झाला. या अपघातात ट्रक चालक लेकराच (वय २६, रा. टेडीबगिया, ता. व जि. आग्रा, उत्तर प्रदेश) याच्या डोक्यासह शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर क्लीनर सोनू निरंजन निषाद (रा. फरे, जि. मथुरा, उत्तर प्रदेश) हा किरकोळ जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तसेच संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अपघातग्रस्त ट्रक बाजूला करण्यात आला. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी घटनास्थळी बॅरिकेडिंग करण्यात आली. जखमी क्लीनरला रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!