मोताळा : तालुक्यातील कोथळी शिवारातील एका विहिरीत ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. गोपाल गंगाराम गायकवाड (रा. इब्राहीमपूर) असे मृताचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल गायकवाड हे दोन दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी परतले नसल्याने कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते. रविवारी (दि. २६) सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास कोथळी शिवारातील एका विहिरीच्या पाण्यावर एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना स्थानिकांच्या निदर्शनास आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. त्याची ओळख गोपाल गायकवाड अशी पटली. मृताचे पुत्र रोहिदास गोपाल गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.