खामगाव : सुटाळपुरा येथील किशोर काशीराम चोपडे (४९) यांना पेट्रोल टाकून जाळल्याच्या प्रकरणात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यानंतर शहर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत आणखी दोघांना अटक केली आहे. या कारवाईनंतर या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या चार झाली आहे.
शहर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये दीपाली किशोर चोपडे आणि पांडुरंग नारायण बोचरे यांचा समावेश आहे. यापूर्वी अजय पांडुरंग बोचरे व संजय पांडुरंग बोचरे या दोघांना अटक करण्यात आली होती. किशोर चोपडे यांना पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याने ते गंभीर भाजले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी तपासाला गती देत या प्रकरणात आणखी दोघांना अटक केली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.