नांदुरा : शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत नांदुरा येथील एका शिक्षकाची तब्बल १० लाख २५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बुलढाणा सायबर पोलिसांकडे दाखल झालेला झिरो एफआयआर नांदुरा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून, अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदुरा येथील शिक्षक अब्दुल अजीम मोहम्मद अलीम (वय ४०) यांनी तक्रार दाखल केली आहे. २७ जानेवारी ते १७ मार्च २०२६ या कालावधीत आरोपींनी ‘फियोडीन स्टॉक मार्केट’मध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस आर्थिक परतावा मिळेल, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विविध बँक खाती आणि यूपीआय आयडीवर टप्प्याटप्प्याने एकूण १० लाख २५ हजार रुपये जमा करून घेतले. मात्र, गुंतवणुकीवर कोणताही परतावा न देता आरोपींनी संपर्क तोडल्याने आपली फसवणूक झाल्याचे शिक्षकांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी बुलढाणा सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेला झिरो एफआयआर नांदुरा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. याप्रकरणी २१ जुलै रोजी भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(२), ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६(सी) व ६६(डी) अंतर्गत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास नांदुरा पोलिस करीत आहेत.